तू गेलास . निघूनच गेलास अगदी हळुवारपणे .
तू जाताना, दूर जाताना, तुझी पाठमोरी आकृती लहान लहान होत अंतर्धान पावताना मी निश्चल होऊन पाहत होतो मी तुला थांबवू शकलो नाही फक्त मी फक्त निरीक्षण करत राहिलो,तुझ्या सोबतचे क्षण आठवत राहिलो तू येताना देखील असाच आला होतास एक एक पाऊल सावकाश टाकत तेंव्हा उन्हे अगदीच वयात येत होती आणि आता त्याची त्यावेळची भिरभिरणारी ओलसर बावरी नजर अत्यंत कोरड्या स्तब्धतेने रोखली गेली आहे.
माझा अव्यवहारी पणा हा नेहमीच तुझ्या चेष्टेचा विषय असायचा पण आता मी खुपदा हिशोब करत बसतो दिवसांचा, महिन्यांचा वर्षांचा ; काय काय कमावलं आणि काय गमावलं ह्याचा पण शेवटी शेवटी मी खूपच संभ्रमित होतो कसलाच मेळ लागत नाही कधी वाटतं हाती खूप काही गवसलं आहे तर पुढच्याच क्षणी वाटतं रीतेपणाने अवकाश भरून गेलंय. मग पुन्हा हिशोब अर्धवट राहतो...

