Thursday, January 26, 2012

शब्द वेडा


मला न तुला काही सांगायचं आहे,
माझं अजूनही तुझ्या शब्दांवर प्रेम आहे.
जेंव्हा मी पहिल्यांदा तुझा मेसेज वाचला त्या क्षणापासून
ते ह्या क्षणापर्यंत ,
तुझ्या शब्द गारुडात मी बंदिवान झालोय.
माझं भानच हरपलंय.
तुझे ते निर्मळ,गूढ,दुर्बोध शब्द मला सतत पाहावेसे वाटतात.
आणि त्यांच्यात गुंतून जावं
परंतु
हे जे शब्दांचे दीर्घ, सघन आणि धारदार काटेरी कुंपण तू तुझ्या कोमल मना भोवती बांधलं आहेस.
ते पार करताना माझी पुरती दमछाक होते. खुपदा मी दिशाहीन होत भरकटत राहतो.
तुझ्या शब्दांची आराधना करतो, पण ते काही प्रसन्न नाही होत त्यांचे काटे बोचून मी मात्र घायाळ होतो.
माझ्या जखमांचं दुखः नाहीय पण असे काटेरी कुंपण बांधताना तुझे हात देखील रक्ताळत असतीलच
त्याचं काय?
प्रदक्षिणा चालूच राहते कुंपणा भोवती.
असे अनेक अश्वथामा त्या मार्गावर असतील
मी ही अनेकांमधील एक

Tuesday, January 17, 2012

रमल

दूर पर्यंत पसरलेली वाळू
पिवळट पिंगट वाळूचे लहान लहान कण.
चौफेर फक्त वाळूचच साम्राज्य
आणि तीही क्षण क्षण तप्त होत रहाते.
प्रत्येक पाऊल ठेचकाळत निर्जल डोळ्यात दूरवर फक्त पाण्याचेच भास
अन जे नाही त्याचीच आस
न उलगलेली कोडी हृदयाशी कवटाळून ..
वाळूतच रमल मांडून
भावी प्रवासातील प्रवाश्याचा पत्ता शोधायचा
पत्ता काय तर म्हणे मुक्काम पोस्ट मृगजळ
हा पत्ता पण काही अगदीच वाईट नाही न!
म्हणजे काय की प्रवास संपेलच कधीतरी
पण मंझील मात्र कायमच चकवा देणार.
आणि खरं तर ............
जाऊ दे
स्वप्नासाठी रात्र आवश्यक
परंतू अंधार वगैरे नाहीच.
शब्द आहेत निर्वेधपणे अस्ताव्यस्त पसरलेले

Sunday, January 15, 2012

आठव


अजूनही तुला कदाचित मैत्रीचे अतूट बंध हवे असतील , नाहीतर केवळ ओळखीचं स्मित देणारा एखादा बेनाम चेहरा
किंवा तुला एखादा प्रेक्षक , वाचक, कुणी तरी तुझा हुरूप वाढवणारा, दाद देणारा दर्दी हवा असेल,
अथवा असं ही असू शकेल तू मला केंव्हाच विस्मृतीच्या कोशात जमा केलं असेल.
परंतु मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय , तुझ्या स्मरणाशिवाय.
तुझे शब्द, तुझी आठवण, तुझ्या बरोबरचे क्षण असे काही हृदयात कोरले गेले आहेत की.....
काळाने कितीही घाव घातले तरीही ते कोरीव काम अबाधितच आहे.
तुला बंधमुक्त करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.
मी तुला ,तुझ्या आठवणींना विसरायचं ठरवतो पण हा संकल्प काही क्षणच टिकतो
एखादी गझल आठवते , एखाद्या गाण्याचे सूर दूर वरून ऐकू येतात, चंद्राची कोर दिसते ,
पाउस पडतो, मावळणारं लालसर केशरी सूर्यबिंब दिसतं. कोणाच्या गालावर खळी खुलते
गुलाबाची कळी दिसते, नदीचं संथ पात्र दिसतं, धुक्याने वेढलेले निळे डोंगर दिसतात,
ह्या सगळ्या सगळ्याची जाणीव क्षणभरच टिकते आणि मग पुढचं दृश्य धूसर व्हायला लागतं.
सूर अस्पष्ट होतात अन मग फक्त तू उरतोस
फक्त तू ,
तुझाच स्पर्श,
तुझाच ध्वनी,
तुझीच जाणीव,
तूच.....