Monday, March 19, 2012

(शहजाद)

काय सांगू मी तुला प्राण प्रिय सख्या तूच एकटा नाही आहेस की जो माझ्यावर चिडून , रागावून रुसून बसला आहेस.किती जिवलगां विरुद्ध जाऊन मी तुला माझं करायचं ठरवलं होतं. तुझ्यासाठी जगाला दूर सोडून मी येथ पर्यंत पोहोचलो आहे परंतु तूच आता पाठ फिरवून निघून चालला आहेस. असा काय अपराध केला आहे मी?
मी तुझ्यात माझा मित्र, माझा प्रियकर, माझा सखा शोधात होतो. कधी मला तुझा हात हातात घेऊन तुझ्या डोळ्यात स्वतःला हरवायचं होतं तर कधी तुला माझ्यात हरवताना अनुभवायचं होतं पण तू तर जणू काही मानवी इच्छा आकांक्षेपासून दूर असलेला गाभाऱ्यात प्रतिष्ठापना झालेला ईश्वरच ज्याच्या समोर मी केवळ नतमस्तक होऊ शकतो.
खरच तू कोण आहेस नक्की ?
जीवदान देणारा एखादा देवदूत की एखादा क्रूर हत्यारा.तुला मी जगावंसं वाटतं की मरावं? कारण त्या भेटीत जे विष तू मला दिलंस त्यात काही अमृतकण देखील होते.जसं ते विष माझ्या अंगांगात भिनून माझा जीव हरण करीत आहे तसच ते अमृतकण माझ्या जगण्याची उमेद वाढवीत आहेत.

No comments:

Post a Comment