Sunday, May 27, 2012

पुनरपी

परंतु फाश्यांचा डाव टाकताना मात्र नाजूक स्पर्शाने देखील स्वप्नचित्र खंडित झालं. त्याचे असंख्य कोरीव तुकडे धुळीस मिळाले. वेड्या मनाला कोण समजावणार त्या तुकड्यांपासून पुन्हा एकदा चित्र बनवायचा ध्यास लागला आहे. असं चित्र पुन्हा बनत नाही ह्याची त्याला कल्पना नाहीय का? परंतु ह्या वेड्या अर्थशून्य खेळामागेही एक गुपित आहे. हे तुकडे एकत्र करताना हात धुळीत माखले जातात आणि हे धारदार तुकडे हातांना खोलवर इजा करतात. मग उष्ण रक्त हातांवर नक्षी कोरु लागते. ते तिथेच थांबत नाही तर जमलेल्या तुकड्यांवर सहस्र धारांनी रुधीराभिषेक होऊ लागतो. नेमकं तेच. अगदी तंतोतंत तसंच.
आता कुठलेच साहस नाही ..... ते परिपूर्ण क्षण सुद्धा नाहीत. कोणतेही इंद्रजाल आता दृष्टीभ्रम करू शकत नाहीत आणि खुपश्या घटना आहेत गोष्टी आहेत ज्या मी तुला अजून सांगितल्या नाही आहेत. जसं की गुलमोहोराच्या झाडांच्या चित्रांचा संग्रह करायचा असं ठरवलंय . वैशाख वणव्यात पेटलेले ते वृक्ष किती अद्भुत दिसतात. आणखीन असं बरंच काही. मला हे न्हवतं सांगायचं दुसरच काही पण मला ते नीटस व्यक्त करता येत नाहीय . मी ने पण कुठेतरी कधीतरी असंच काहीसं. ते इतक्या दूर पुन्हा एकदा. ( क्षणभर एखादी हलकीशी आठी तुझ्या ललाटावर इतकेच.. पुन्हा सगळे नितळ... केवळ एक कंस अर्धाच

No comments:

Post a Comment