हिरव्यागार पाण्याचे एक तळे आहे.
आणि आजूबाजूला पिवळसर तांबड्या रंगाचे खडक आहेत.
तिथूनच दूरवर एक स्मशान भूमी दिसते आहे.
हिरव्या गवतात, झाडा झुडूपात
पांढ-या करड्या रंगाच्या कबरी उठून दिसत आहेत.
ह्या तळ्याला तळं म्हणण्यापेक्षा कुंड म्हणावे असं त्याला वाटतं
पण मग मी हि हट्टाने त्याला तळेच म्हणतो.
माझ्या मागे खूप मागे एक मोठी सडक आहे.
मी कधी ती पहिली नाही कि त्या वरून जाणाऱ्या वाहनांचे आवाज ऐकले नाहीत
पण तसा रस्ता तिथे असेल असं उगाच वाटत रहातं.
आणि उजव्या बाजूला रेल्वेचे रूळ आहेत.
आम्ही बसलोय तिथून जवळच आहेत. पण साधारण जमिनीपासून पंधरा वीस फुटांवर तरी असतील.
आम्ही बोलतोय खूप बोलतोय.
तरी पण खूप खूप प्राचीन शांतता आहे.
दुसरं काहीच ऐकू येत नाही
मात्र....
ईश च्या आवाजाने आसमंत भरून राहिलंय.
त्याच्या मृदू आणि शीतल शब्दांचे बाण अखंडपणे बरसत राहतात.
आणि क्षतिग्रस्त मी रक्ताळून बेहोष होत राहतो.
आता मला एक अमानवी मानुष दिसतोय .
पांढरा शर्ट, काळा टाय, काळी पँट आणि खूप मोठा काळा ओवर कोट ,
तो रुळांवरून धावतोय ..
रुळांवरून खाली जमिनीवर तो धप्प उडी मारतो
आणि धावत धावत स्मशानात जातोय.....
तो खूपच उंच आणि धिप्पाड आहे.....
पण त्याचा चेहरा मात्र स्पष्टपणे दिसत नाहीय
(खरच का तो स्पष्ट दिसत नाही की ...)
पुढे काय होणार ह्याच्या अंधुकश्या जाणीवेने
मी हुंदके देऊ लागतो..
तो आता परत आलाय
आमच्या खूप जवळ आलाय
आणि मोठ्या कर्कश्य आवाजात तो काही आज्ञा देतो आहे.
पण
मी स्वतःला समजावून सांगतो आहे स्वप्न पडतंय उठ लवकर.
पण ईशच्या डोळ्यातील भीती तर खरीच आहे न
तो म्हणे फक्त आमच्या दोघांसाठी आलाय ..
आणि बाकीच्या लोकांसाठी त्याचे इतर साथीदार आहेत.
आता बाकीच्या लोकांचा गोंगाट सुरु होतो..
खूप लोकं आहेत..
गरीब, श्रीमंत पांढरे पोशाख केलेले, लाल कपडे घातलेले
बाया, पुरुष , मुलं खूपच
तळ्याच्या चारी बाजूनी दगडी पाय-या आत उतरत जातात
आणि हे सगळे लोक ह्या पाय-यां वर उभे आहेत.
आणि त्याचा एकेक साथी दार ह्या लोकांसमोर उभा आहे.
आता आमच्या हातात एकेक कागद आहेत
आणि थोड्याच वेळात उच्च रवात मंत्रघोष सुरु होतोय
हे आपण ऐकायला नको आहे अजून खूपच अज्ञानी आहोत आम्ही,
या वयात असलं काही कानावर पडू नये असं वाटत रहातं.
आता आम्ही सगळेच कागदावर लिहिण्यात मग्न आहोत
खूप काही महत्वाचं लिहायचं आहे जणू काही आमचं भाग्यच.
शेवटचा उच्च बिंदू जवळ येत आहे. सगळ्यांचच लिहून झालंय.
सगळेच जण आपापला कागद समोर उभ्या असलेल्या अमानवी मनुष्याच्या
साथीदारांकडे देत आहेत.
अचानक मी त्याला विचारतो हा कागद तुला द्यायचा की पाण्यात विसर्जन करायचा?
तो हसू लागतो मोठ्याने , खूप मोठ्याने अगदी ढगांच्या गडगडाटा सारखा .
मी घाबरतो
मी भांबावतो.
त्याची प्रचंड मुठ माझ्या मनगटा भोवती आवळली जातेय.
(मी आशेने शेजारीच उभ्या असलेल्या ईशकडे पाहू लागतो
पण त्याची दाहक नजरेने मी सगळंच उमजून घेतो..)
तो म्हणतो ह्याच साठी हे सगळं आम्ही केलं होतं.
इतके दिवस लपत होतास पण कधीतरी कुठेतरी तू आम्हाला सापडणार होतासच.
तो जोराचा हिसका देतो आणि मी त्या हिरव्यागार पाण्यात दिसेनासा होतो आहे.
लिहून काढशील असे वाटलं न वाटलं आणि तू लिहलंस
ReplyDeleteवाचल्या बद्दल आभारी आहे.
ReplyDelete